Jalna News : जालना जिल्हा प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जालना : मागच्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असते. जालना जिल्ह्यानेदेखील अपघात रोखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून जालना शहरातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी जोर धरत होती. सततची वाहतूककोंडी आणि अपघात रोखण्यासाठी आता प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
काय घेतला निर्णय?
जालना जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये शहरातून वाहतूक होणाऱ्या अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ते बांधण्यावर महानगरपालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये सहमती झाली आहे. शहरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या शेडकेडे शहरातून येणारी अवजड वाहने पर्यायी मार्गाने यावीत यासाठी नवीन रस्त्यांचे बांधकाम करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने रेल्वे आणि महानगरपालिकेला दिले आहेत.
का घेण्यात आला निर्णय?
जालना शहरातून अवजड वाहनांची विशेषतः रेल्वे मालवाहतूक शेडकडे जाणारी वाहनांची वर्दळ ही वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमुख कारण आहे. या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला. जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नदोरे यांनी ही मागणी उचलून धरली होती.
काय असतील पर्यायी मार्ग?
अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय करण्यात आला की रेल्वे विभाग रेल्वेच्या जमिनीवर मालवाहतूक शेड पासून अंतर्गत रस्ते बांधेल. तर जालना महानगरपालिका उर्वरित रस्त्यांचे नेटवर्क विकसित करेल. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकना शहरातून न जाता अंबड उड्डाणपूलापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.





