Jalna News : पंकजा मुंडेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; पोलिस उपअधीक्षकाने आंदोलकाच्या कमरेत घातली लाथ

जालना : जालना जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी रोखले, मात्र यावेळी पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लाथ मारल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे स्वातंत्र्यदिनानिमित्त जालन्यात आल्या असताना एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना तिथेच अडवले आणि त्यांना हुसकावून लावले. यावेळी आंदोलकाला नेत असताना पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्याच्या कमरेत लाथ मारली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उपोषणामागचं कारण काय?
जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात एका कौटुंबिक वादातून दाखल गुन्ह्याबाबत आंदोलक अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. पोलिस आरोपींना पाठिशी घालून फिर्यादींना त्रास देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना यश आले नाही. या घटनेने पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





