Jalna: जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना भाजपसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आणि त्यांची पत्नी सुशीला दानवे यांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे जालना महापालिकेत दानवे कुटुंबाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीत १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी तब्बल ४५४ उमेदवार रिंगणात होते. या चुरशीच्या लढतीत भाजपने विशेषतः प्रभाग क्रमांक १ मध्ये जोरदार कामगिरी करत पाचही उमेदवार विजयी केले आहेत. युती तुटल्याने राजकीय समीकरणे बदलली निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र या बैठका निष्फळ ठरल्याने अखेर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जालन्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आणि प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मनसे यांची युती झाली होती. महाविकास आघाडीतील घटक पक्षही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने राजकीय लढत अधिकच रंगतदार ठरली. अनेक प्रभागांत अपक्ष उमेदवारांनीही दिग्गज नेत्यांना कडवी टक्कर दिली. शांततेत मतदान शहरातील २९१ मतदान केंद्रांवर गुरुवारी (दि. १५ जानेवारी २०२६) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीमुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला होता. आता अंतिम निकालातून कोणता पक्ष महापालिकेवर वर्चस्व मिळवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.