Jalna Accident : जालन्यामध्ये भीषण अपघात; 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

जालना : जालना-बदनापूर मार्गावरील राजुर रोडवर रविवारी (दि. १७) झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मालवाहू ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली. या दुर्दैवी घटनेने मांडवा गावात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये भरत निवृत्ती खोसे (वय ३३), गणेश तुकाराम बोरसे (वय ३४) आणि सुनिता नारायण वैद्य (वय ३६), सर्व रा. मांडवा, यांचा समावेश आहे. हे तिघे जण ॲपे रिक्षाने जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे जात होते. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
अपघात कसा घडला?
राजुर रोडवरील सुर्या लॉन्सजवळ मालवाहू ट्रकने (क्र. RJ 01 GB 8486) ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा उद्ध्वस्त झाली आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.
अपघातस्थळी बघ्यांची गर्दी
अपघाताची बातमी पसरताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ट्रकचा अतिवेग आणि चालकाचा निष्काळजीपणा यांना संभाव्य कारण मानले जात आहे. गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अतिवेग हे प्रमुख कारण ठरत आहे. यामुळे वाहनचालकांनी रहदारीच्या ठिकाणी वेग नियंत्रित ठेवण्याची आणि खबरदारी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या अपघाताने मांडवा गावावर दुखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





