दावडी : खेड तालुक्यातील सुरकुंडी गावात जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेची कामे गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडली असून ग्रामस्थांना तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. सुरुवातीला कामांना गती मिळाली असली तरी पाईपलाईन टाकताना आलेल्या अडचणींमुळे प्रस्ताव वाढीव मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र त्यानंतरही कामे ठप्पच राहिल्याची स्थिती आहे. गावातील अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. काही जीआय पाईप जमिनीत गाडले न जाता उघड्यावरच ठेवण्यात आले असून शेतकर्यांना शेतीकामात अडथळे निर्माण होत आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या खोदकामामुळे शेतकर्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. संबंधित ठेकेदाराकडे वारंवार पाठपुरावा करूनही कामे पूर्ण करण्यात आलेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, उभारण्यात आलेली पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत असून तिच्या भिंतींचे तुकडे पडू लागल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व संबंधित अधिकार्यांना वारंवार कळवूनही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. शाखा अभियंता शृंगारे यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन ठेकेदार व अधिकार्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते; मात्र ते अनुपस्थित राहिल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच रस्त्यांचे खोदकाम करून ते तसेच सोडल्याने पावसाळ्यात मोठे खड्डे पडले असून वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायतीने मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती केली आहे. योजनेअंतर्गत अद्याप नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून आश्वासने मिळत असली तरी प्रत्यक्षात प्रगती दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांनी अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून अपूर्ण कामे पूर्ण करावीत व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.