जळगाव: कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर जळगावच्या लोकेश संजय भालेराव आणि दर्पण संजय भालेराव या सख्ख्या भावांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकाच वेळी घवघवीत यश संपादन केले आहे. लोकेशने ४५ वा क्रमांक, तर दर्पणने ९५ वा क्रमांक पटकावत केवळ आई-वडिलांचे नव्हे, तर जळगाव शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. भालेराव बंधूंचे वडील संजय काशिनाथ भालेराव हे सध्या जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. घरातूनच लाभलेल्या शिक्षणाच्या ओढीमुळे आणि प्रामाणिकपणाच्या संस्कारामुळे दोन्ही भावांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. वडिलांच्या शासकीय सेवेतील कार्यामुळेच त्यांनाही प्रशासकीय अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. लोकेश आणि दर्पण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव येथील रावसाहेब रूपचंद विद्यालयात पूर्ण झाले. यानंतर लोकेशने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेकची पदवी घेतली, तर दर्पणने पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून कॉम्पुटर इंजिनिअरींगमध्ये बीईची पदवी मिळवली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ दोघेही खासगी क्षेत्रात कार्यरत होते. मात्र, समाजासाठी भरीव योगदान देण्याची तळमळ आणि प्रशासकीय सेवेची ओढ यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षांचा खडतर मार्ग निवडला. गेली काही वर्षे सातत्याने अभ्यास करताना अनेक अडचणी, अपयश आणि तणावाचे क्षण आले. परंतु, या दोघांनी कधीही हार मानली नाही. “अभ्यास एके अभ्यास” हा मंत्र स्वीकारत, कोणत्याही खासगी मार्गदर्शकाशिवाय त्यांनी केवळ आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर हे यश खेचून आणले. या यशानंतर भालेराव कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या लोकेश जलसंपदा विभागात सहायक अभियंता (श्रेणी-२) म्हणून कार्यरत आहे, तर दर्पण याचीही वर्ग-१ अधिकारी पदावर नियुक्ती निश्चित झाली आहे. एकाच वेळी दोन्ही भाऊ आता वर्ग एकचे अधिकारी झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचे आणि स्वप्नपूर्तीचे स्पष्ट समाधान दिसून येत आहे. ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्रोत – भालेराव बंधूंचे यश हे केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून, जळगावसारख्या शहरासह ग्रामीण भागातील असंख्य तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा ठरली आहे. सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशेने वाटचाल केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे या दोघांनी सिद्ध केले आहे. “ध्येय निश्चित करून त्या दिशेने एकाग्रतेने वाटचाल करा. मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी कुटुंब आणि मित्रांचा आधार घ्या. अपयशाला शिकवणीसारखे घेऊन चुका ओळखा आणि सुधारणा करा. ग्रामीण पार्श्वभूमी ही अडथळा नाही. जिद्द आणि प्रयत्न असतील तर यश निश्चित मिळते,” असा मोलाचा संदेश या यशस्वी भावांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना दिला आहे.