जळगाव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. शहरातील जुना निमखेडी रोडवर पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन सख्खे भाऊ, ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने शिवदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृतांपैकी ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेनेच्या जळगाव शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती असून, प्रमोद शिवदे हे त्यांचे दीर होते. दोघेही पहाटे चारच्या सुमारास आपल्या पाणीपुरी व्यवसायासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी रिक्षाने निघाले होते. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांपैकी एका डंपरने धडक दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला. यात दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर 15 ते 20 जण जखमी झाले. आज सकाळी जळगावहून अकोल्याकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स बस ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला, तर दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातामूळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.