जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 वर्षीय तेजस महाजन या मुलाची गळा चिरून हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, ही हत्या नरबळीसाठी करण्यात आली का? असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी बाजारात फिरताना तेजसने एका दुकानातून बिर्याणी घेतली होती. मात्र त्यानंतर, सायंकाळी सात वाजल्यापासून तो कुणालाच दिसला नाही. बेपत्ता झाल्यानंतर गावात शोधमोहीम सुरू झाली. जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु त्याचा काहीही पत्ता लागला नव्हता. बाजार परिसर थोडा आत असल्यामुळे सुरुवातीला कोणाचेही तिकडे लक्ष गेले नाही. अखेरीस, एका व्यक्तीला तेजसचा मृतदेह आढळून आला. त्याने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.