जयस्वाल, सॅमसनच्या खेळीने राजस्थानचा कोलकातावर विजय

कोलकाता -सलामीवीर यशस्वी जयस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेत गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सवर 9 गडी राखून विजय मिळवला. जयस्वालने विक्रमी अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याला नंतर स्ट्राईक मिळाली नाही व तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही. कर्णधार सॅमसननेही धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र, तोदेखील अर्धशतकापासून वंचित राहिला.
विजयासाठी 150 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरुवात सलामीवीर यशस्वी जयस्वालने धडाक्यात केली. संघाच्या 31 धावा झालेल्या असताना जोस बटलर अनावश्यकपणे चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याने खातेही उघडले नव्हते, यावरूनच जयस्वालच्या फटकेबाजीची कल्पना येते. त्यानंतर जयस्वालने कर्णधार संजू सॅमसनसह संघाचे अर्धशतक पूर्ण केले. जयस्वालने डावाची सुरुवातच सलग दोन षटकार मारून केली. याच डावातील पहिल्या षटकात जयस्वालने आणखी तीन चौकार फटकावत एकाच षटकात 26 धावा वसूल केल्या. या जोडीने 9 व्याच षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. त्यात सॅमसनचा वाटा केवळ 16 धावांचा होता. त्यानंतर अचानक सॅमसनने गिअर बदलला व आक्रमक फलंदाजी केली. त्याच्या धडाक्यामुळे जयस्वालला स्ट्राईक कमी मिळाली व त्यामुळे तो 98 धावांवर नाबाद राहिला. त्याला सॅमसनने फलंदाजीची जास्त संधी दिली असती तर त्याचे विक्रमी शतक साकार झाले असते.
जयस्वालने एकेरी धावांवर भर दिला. त्याचा लाभ घेत सॅमसननेही चौकार व षटकारांची आतषबाजी केली. मात्र, तोदेखील अर्धशतक पूर्ण करू शकला नाही व 48 धावांवर नाबाद राहिला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 121 धावांची अभेद्द भागीदारी केली व 14 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर संघाचा विजय साकार केला. राजस्थानचा हा स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान विजय ठरला. त्यांनी 41 चेंडू राखून हा सामना जिंकला. यापूर्वी डेक्कन चार्जर्सने 2008 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध 48 चेंडू राखून सामना जिंकला होता.
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या गुरुवारी झालेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने फटकावलेल्या अफलातून अर्धशतकानंतरही कोलकाता नाईट रायडर्सचा डाव 20 षटकांत 8 बाद 149 असा रोखला गेला. अय्यरने एकहाती खेळी केली. मात्र, त्यानंतरही कोलकाताच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. संघात परतलेल्या ट्रेन्ट बोल्टने जेसन रॉय व रेहमनुल्ला गुरबाज यांना बाद करत राजस्थानला सुरेख सुरुवात करून दिली. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने कर्णधार नितीश राणाच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. राणा स्थिरावलेला असताना 22 धावांवर बाद झाला. त्याने अनावश्यक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली. दुसरीकडे अय्यरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी केली. त्याने आंद्रे रसेलसह संघाला शतकी मजल मारून दिली. रसेलही चांगला खेळत असताना परतला. अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो देखील 57 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 42 चेंडूत 2 चौकार व 4 षटकार फटकावले. रसेलच्या जागी फलंदाजीला आलेल्या व भरात असलेल्या रिंकू सिंगने थोडीफार चमक दाखवली, मात्र तो 16 धावांवर बाद झाला व त्यानंतर कोलकाताचा डाव घसरला. युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. बोल्टने 2 बळी घेतले.
जयस्वालचे विक्रमी अर्धशतक
जयस्वालने या लढतीद्वारे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक साकार केले. त्याने अवघ्या 13 चेंडूत हा पल्ला गाठला. त्याच्या वादळी फलंदाजीसमोर कोलकाताचे गोलंदाज हतबल झाले. त्याने लोकेश राहुल व पॅट कमिन्स यांच्या वेगवान अर्धशतकाची कामगिरी मागे टाकली व आपल्या नावावर हा विक्रम नोंदवला. राहुल व कमिन्स यांनी प्रत्येकी 14 चेंडूत अर्धशतक साकार केले होते. राहुलने 2018 साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तर कमिन्सने 2022 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध ही खेळी केली होती. जयस्वालने या सामन्यात नाबाद 98 धावांची खेळी
साकार केली.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 8 बाद 149 धावा. (व्यंकटेश अय्यर 57, नितीश राणा 22, यजुवेंद्र चहल 4-25, ट्रेन्ट बोल्ट 2-15). राजस्थान रॉयल्स – 13.1 षटकांत 1 बाद 151 धावा. (यशस्वी जयस्वाल नाबाद 98, संजू सॅमसन नाबाद 48)





