नवी दिल्ली : दीर्घ प्रतीक्षेनंतर, बहुचर्चित 16 व्या जनगणनेची अधिसूचना अखेर जारी करण्यात आली आहे. परंतु हे पाऊल खोदा पहाड़ निकला चूहा यासारखी आहे. कारण ही अधिसूचना 30 एप्रिल 2025 रोजी आधीच जाहीर केलेल्या गोष्टीचाच पुनरुच्चार करते, असे म्हणत काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जनगणनेच्या अधिसूचनेवरून मोदी सरकारला टोला लगाविला. जनगणनेसंदर्भात अधिसूचना आल्यानंतर जयराम रमेश म्हणाले, खरं तर काँग्रेसच्या सततच्या मागणी आणि दबावामुळे पंतप्रधानांना जातीय जनगणनेसह जनगणना करण्याच्या मुद्द्यावर झुकावे लागले. परंतु या मागणीसाठी पंतप्रधानांनी काँग्रेस नेत्यांना शहरी नक्षलवादी असेही म्हटले होते. संसद असो किंवा सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारने जातीय जनगणनेसह जनगणना करण्याचा विचार पूर्णपणे नाकारला होता. अगदी 47 दिवसांपूर्वी सरकारने स्वतःच यासंदर्भात घोषणा केली होती. पंतप्रधानांवर टीका करताना जयराम रमेश यांनी दावा केला की, आज जारी केलेल्या अधिसूचनेत कुठेही जातीय जनगणनेचा उल्लेख नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी जातनिहाय जनगणनेसाठी पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे का? असा प्रश्न उपस्थित करत जयराम रमेश म्हणाले की, 16 व्या जनगणनेत तेलंगणा मॉडेल स्वीकारले पाहिजे, असे काँग्रेसचे स्पष्ट मत आहे. कारण तेलंगणा मॉडेलनुसार केवळ जातींची गणनाच नाही तर जातीनिहाय सामाजिक आणि आर्थिक स्थितीशी संबंधित तपशीलवार माहिती देखील गोळा केली पाहिजे. तेलंगणाच्या जात सर्वेक्षणात 56 प्रश्न विचारण्यात आले होते. आता प्रश्न असा आहे की, 56 इंचाच्या छातीचा दावा करणाऱ्या जैविक नसलेल्या व्यक्तीकडे 16 व्या जनगणनेत 56 प्रश्न विचारण्याची पुरेशी समज आणि धाडस आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.