प्रभात वृत्तसेवा पुणे – जैन बोर्डिंगच्या दुरावस्थेस शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्र्स्टच जबाबदार आहे. यातील ज्या ट्र्स्टींना ट्रस्टची प्रक्रिया, कामकाज, नियम माहित नसल्यास त्यांना ट्रस्टमधून तत्काळ हटवावे, अशी मागणी जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केली.जैन बोर्डिंग जमिनीचा विक्री व्यवहार रद्द व्हावा यासाठी मुंबईतील राज्य धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्याकडे याचिका दाखल करून दाद मागण्यात आली होती. गोखले बिल्डर व ट्र्स्टींनी व्यवहार रद्द करण्याबाबत सहमती दर्शवित त्याबाबत दोघांचे संयुक्त प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी ३० ऑक्टोबरला सुनावणी घेऊन निर्णय दिला होता. त्यात विक्रीखत व पॉवर ऑफ अटर्नी रद्द करून मालमत्ता पुन्हा ट्रस्टच्या नावावर नोंदविण्याचे निर्देश दिले होते. दिवाणी न्यायालयात बिल्डर व ट्र्स्टने जमीन विक्री व्यवहार रद्द करण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. त्यावर जमीन विक्री व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी (दि.१४) दिले आहेत. जैन बोर्डिंग जमिनीचा विक्री व्यवहार रद्द व्हावा, यासाठी जैन समाजाने आंदोलने केली. जैन समाज, संस्था व संघटना, सर्व राजकीय पक्ष, युवक यासह अन्य सर्व घटकांच्या सहकार्यामुळे प्रश्न सुटला आहे, असे गुप्तीनंद महाराज यांनी स्पष्ट केले आहे. जैन बोर्डिंगमधील संत निवास, होस्टेल, खानावळ मधील फर्निचर, पंखे, बेड यासह अन्य साहित्य गायब झाले आहे. याला ट्र्स्टच जबाबदार आहे. त्यामुळे आता ट्रस्टेनेच संत निवास, होस्टेल, खानावळ मध्ये आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ट्र्स्टींना नियम, कार्य, कामकाज माहिती नाही. काही ट्र्स्टी जैन बोर्डिंगकडे कधी फिरकलेही नाहीत. त्यामुळे अशा ट्र्स्टींना ट्र्स्टमधून हटवावे. ज्यांना नियम माहित आहेत त्यांनाच ट्र्स्टमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. जैन बोर्डिंगची एकुण सात एकर जागा होती. त्यातील केवळ तीन एकर जागा शिल्लक राहिली आहे. उर्वरित चार एकर जमीन गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ही उर्वरित जमीन पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी ट्र्स्टींनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणीही आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी केली आहे. भोपाळ, मध्य प्रदेशातील जैन समाजाचे मेडीकल कॉलेज २५ वर्षापूर्वी सुरू केले होते. ट्र्स्टींमधील आपआपासातील वादांमुळे हे कॉलेज लिलावात काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, हे कॉलेज वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.आचार्य गुप्तीनंद महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी द्यावी, अशी मागणीही जैन समाज बांधवाकडून करण्यात येऊ लागली आहे. भगवान महावीरांची मोठी मूर्ती उभारावी… जैन बोर्डिंगच्या आवारात भगवान महावीर स्वामींची मोठी मूर्ती उभारावी. ही मूर्ती उभारण्यास ट्र्स्ट सक्षम नसल्यास भक्तांच्या सहयोगातून ही मूर्ती उभारावी लागणार आहे. जोपर्यंत ही मूर्ती उभारली जात नाही. तोपर्यंत गोड, तेलकट पदार्थ व भात खाणार नसल्याचा संकल्पही जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी जाहीर केला आहे.