Jai Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आज विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. माझ्यावर पत्रकार परिषद न घेण्याबाबत कोणाचाही दबाव नसून पुढील आठवड्यात मी पत्रकार परिषद घेणार असल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर जय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊ नये, असा सल्ला देण्यात आला असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना जय पवार म्हणाले की, “माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेणार आहे.” तसेच त्यांनी सुनेत्रा वहिनींसह सर्वांना VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करू नका, असा सल्ला दिल्याचेही सांगितले. या प्रकरणात CBI चौकशीची मागणी कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट अजित पवारांसोबत झालेल्या विमान अपघातात केबिन क्रू म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या आईवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर आज जय पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. १८ मजले पायी उतरले या भेटीनंतर जय पवार यांनी इमारतीतील १८ मजले पायी उतरून खाली येणे पसंत केले. लिफ्टने वर जाताना लिफ्टमधून आवाज येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी परतीच्या वेळी लिफ्टचा वापर टाळला. राहुल गांधींचे ट्विट दरम्यान, राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत सांगितले की, रोहित पवार यांनी बारामती विमान अपघात आणि अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र दिले आहे. या घटनेत कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे पालन झालेले दिसत नाही आणि अद्याप कोणताही एफआयआर नोंदवलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.