शेतकऱ्यांच्या विश्वासावर जय हनुमान सहकारी संस्थेची भरारी – प्रशांत जोरी

जांबूत : सहकारी संस्थांच्या यशस्वीतेचा पाया हा सभासदांचा विश्वास आणि पाठबळावर अवलंबून असतो. पारदर्शक कामकाज आणि शेतकरी-कर्जदारांच्या विश्वासाला पात्र ठरत जय हनुमान विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने मोठी आर्थिक उलाढाल करत नावलौकिक मिळवला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जोरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून मागील आर्थिक वर्षात संस्थेने ९३ टक्के कर्जवसुली करत नफा कमावला आहे. यामध्ये संचालक मंडळ आणि प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
शिरुर तालुक्यातील शरदवाडी येथील या संस्थेने आपल्या पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित कामकाजाच्या जोरावर उल्लेखनीय प्रगती केली आहे. जोरी यांनी पुढे सांगितले की, परिसरातील सर्व सहकारी संस्थांनी अशाच प्रकारे पारदर्शक कामकाज करून शेतकऱ्यांना कर्ज योजनांची माहिती देऊन संस्थेच्या नफ्यात वाढ करावी.
संस्थेची आर्थिक उलाढाल आणि यश –
जय हनुमान विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची एकूण सभासद संख्या ३८४ असून, यापैकी १९६ सभासदांना सुमारे ६८ लाख ५१ हजार १२७ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल १९ लाख ९७ हजार ८३ रुपये असून, तब्बल १० लाख ७३ हजार ८६१ रुपये राखीव निधी म्हणून ठेवण्यात आला आहे. याशिवाय ७ लाख ६० हजार रुपये इतर निधी म्हणून जमा करण्यात आले आहेत.
जोरी यांचे पारदर्शक नेतृत्व –
प्रशांत जोरी यांनी केवळ जय हनुमान सहकारी संस्थेतच नव्हे, तर संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्थेतही आपल्या पारदर्शक आणि उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. जोरी यांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान सहकारी संस्थेने शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, सहकारी चळवळीला नवी दिशा दिली आहे.





