नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्याविरोधात सीबीआयने युनियन बँक ऑफ इंडियाशी संबंधित २२८.०६ कोटी रुपयांच्या कथित कर्ज फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे माजी संचालक जय अनमोल अंबानी व रवींद्र शरद सुधाकर यांचा समावेश आहे. सीबीआयनुसार, हे प्रकरण सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीशी संबंधित आहे. बँकेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. बॅंकेने केलेल्या तक्रारीनुसार, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने मुंबई शाखेतून व्यावसायिक उद्देशांसाठी ४५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कंपनीला कर्जाच्या अटींनुसार निधीचा योग्य वापर, वेळेवर ईएमआय व व्याज भरणे, तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक होते. मात्र, या अटींचे उल्लंघन झाल्याने ३० सप्टेंबर २०१९ रोजी या खात्याला बूडीत खाते घोषित करण्यात आले. लंडन येथील ग्रँट थॉर्नटन या कंपनीने एप्रिल २०१६ ते जून २०१९ या कालावधीतील फॉरेन्सिक ऑडिटमध्ये कर्ज निधीचा गैरवापर झाल्याचे उघड केले. कंपनीच्या ऑडिट अहवालानुसार, कर्ज मंजूर झालेल्या उद्देशाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी निधी वळवण्यात आला. बँकेचा आरोप आहे की, माजी प्रवर्तक व संचालकांनी खात्यांमध्ये फेरफार करून गुन्हेगारी विश्वासघात व फसवणूक केली. दरम्यान, ईडीने ही अनिल अंबानी समूहाविरोधात कारवाई तीव्र केली आहे. ईडीने अलीकडेच सुमारे १,१२० कोटी रुपयांच्या नवीन मालमत्ता जप्त केल्या असून, याआधी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि येस बँकशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणांत हजारो कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.