पिंपरी -चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दूरदृष्टी ठेवून चिंचवड मतदारसंघात विकासकामे केली. त्यातून संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल झाला. हा बदल जनतेला कळतो. भाऊंनी केलेल्या विकासकामांमुळेच ही जनता पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करणार याची मला पूर्ण खात्री असल्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 12) सांगितले.
चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती व प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे काळेवाडी, तापकीरनगर येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, रासपचे शहराध्यक्ष भरत महानवर, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष विनोद गायकवाड, लोकजनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, हरेश तापकीर, सोमनाथ तापकीर, राज तापकीर, माजी नगरसेविका सुनिता तापकीर यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचेही योगदान आहे. येथील जनता विकासकामाला प्राधान्य देणारी आहे. जनतेला लक्ष्मण जगताप यांनी केलेला विकास दिसतो आहे. त्यामुळेच ही जनता लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करणार याची मला पूर्ण खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.