विविध मागण्यांसाठी जगताप दाम्पत्याचे उपोषण

शिर्डी – साई संस्थानने देशभरात पन्नास लाख रुपये देऊन साई मंदिर उभारण्याच्या निर्णयाविरोधात, तसेच अन्य मागण्यांसाठी माजी नगराध्यक्षा अनिता जगताप व त्यांचे पती विजयराव जगताप यांनी आज (गुरुवार)पासून साई संस्थानच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोर उपोषणास प्रारंभ केला.
शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवाजीराजे गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, सुजित गोंदकर आदींनी उपोषणास पाठिंबा दिला आहे. जगताप दाम्पत्याने म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून भाविकांच्या मनोरंजनासाठी साईसृष्टी, थीमपार्क, स्वीमिंगपूल, अद्ययावत व्यायाम शाळा, सांस्कृतिक भवन, लेजर शो गार्डन व मनोरंजनाची साधने हे फक्त कागदावरच असून, ते त्वरित विकसित करावे, तसेच साई संस्थानमधील काही विभागातील होणारे गैरव्यवहार याच्यावर नियंत्रण ठेवून कडक कारवाई करावी, संस्थानच्या वार्षिक उत्पन्नाच्या तीस टक्के रक्कम ही शिर्डी शहर विकासकामांसाठी द्यावी, शिर्डी शहरात नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊ नये, म्हणून रस्ते क्रॉस करण्यासाठी स्कायवॉकची सुविधा निर्माण करावी, तसेच साई संस्थानकरिता आरक्षण असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्याचा योग्य तो मोबदला जमीनमालकाला देऊन आरक्षण विकसित करावे, तसेच अर्धवट असलेल्या रिंगरोड चे काम त्वरित सुरू करावे या मागण्यांसाठी जगताप दाम्पत्य आमरण उपोषणाला बसले आहे.
आम्हाला तोंडी आश्वासन नको, तर लेखी स्वरूपात आमच्या सर्व मागण्या मान्य करून तसे पत्र जोपर्यंत साई संस्थान प्रशासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, अशी माहिती जगताप दाम्पत्याने दिली आहे.
अधिकाऱ्यांची शिष्टाई असफल!
दरम्यान, साई संस्थानच्या सुरक्षा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील.
शिर्डीसारख्या तीर्थस्थानी एका महिलेला उपोषण करण्याची वेळ येते हे दुर्दैवी आहे. त्यामुळे साई संस्थानने यावर गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घ्यावा; अन्यथा आमच्यासह हजारो कार्यकर्ते या उपोषणामध्ये साखळी पद्धतीने सहभागी होणार आहे.
कैलासबापू कोते , शिर्डी





