पुणे – भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नावची घोषणा होण्याची शक्यता आहे. बुधवारी पक्षाचा मेळावा होणार असून, त्यामध्ये ही निवड जाहीर होईल.
विधानसभा निवडणुकीआधी शहराध्यक्षपद आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आले होते. या निवडणुकांनंतर शहराध्यक्षपदाच्या निवडीही पक्षाने जाहीर केल्या आहेत. एका व्यक्तीकडे दोन पदे नाही, या न्यायाने मिसाळ यांच्याकडील शहराध्यक्षपद अन्य नेत्यास देण्यात येणार होते. त्यानुसार या पदासाठी माजी आमदार मुळीक यांच्यासह नगरसेवक गणेश बिडकर यांचे नाव चर्चेत होते.
त्यातही देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले बिडकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, बिडकर यांच्या नावाला एका गटाकडून विरोध झाला. त्यामुळे मुळीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. बुधवारी पक्षाच्या संघटनात्मक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतमुळीक यांची नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.