नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांना प्रकृती बिघडल्यामुळे सोमवारी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना दोनदा भोवळ आल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला असून, आज त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्यांसह एमआरआय स्कॅन केले जाणार आहे. १० जानेवारी रोजी धनखड यांची दोनदा शुद्ध हरपण्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर आज ते नियमित तपासणीसाठी एम्समध्ये गेले असता, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीचे गांभीर्य ओळखून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. उपराष्ट्रपती पदावर कार्यरत असताना धनखड यांना यापूर्वीही अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान भोवळ येण्याचे प्रकार घडले आहेत.