इंदापूर : राज्याच्या राजकारणात विधान परिषद नियुक्त्यांच्या हालचालींना वेग आला असतानाच इंदापूर तालुक्यातून जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे नाव आघाडीवर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत जगदाळे यांना विधान परिषदेत संधी देण्याची ठाम मागणी केली. पुण्यात झालेल्या या बैठकीत इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील संचालक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती संदीप पाटील, माजी सभापती दत्तात्रय फडतरे, नगर परिषदेचे गटनेते शकील सय्यद, निरा-भीमा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामकृष्ण मोरे, छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक अनिल बागल तसेच बाजार समिती संचालक संतोष वाबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने आप्पासाहेब जगदाळे यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा मांडत, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने मोठा आधार दिल्याचे नमूद केले. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले. दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी जगदाळे यांना विधान परिषदेत संधी दिली जाईल, असा शब्द कार्यकर्त्यांना दिल्याची आठवणही यावेळी करून देण्यात आली. त्यामुळे आता पक्ष नेतृत्वाने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच विधान परिषद किंवा राज्यपाल नियुक्त कोट्यातून त्यांना संधी द्यावी, अशी भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली. दरम्यान, या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल,असा शब्द सुनेत्रा पवार यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, आगामी काळात विधान परिषदेसाठी जगदाळे यांच्या नावाची चर्चा अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : सनरायझर्स हैदराबादचा आरसीबीवर ५५ धावांनी विजय, पण एका चुकीमुळे हुकलं ‘क्वालिफायर १’ चं तिकीट