किशोरवयीन मुलींना आहार व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
मोरगाव – एकात्मिक बाल विकास सेवा योजना बारामती विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधी मध्ये तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त शुक्रवारी (दि. 3) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, गावात प्रभात फेरी व जागर महिला शक्तीचा या कार्यक्रमाचे उद्घाटन बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अक्षय पात्र कार्यक्रमाअंतर्गत 1 ते 11 जानेवारी गुळ-शेंगदाणे, बटाटा बालकांसाठी गोळा करणे, त्यापासून पौष्टिक आहार तयार करून वाटप करणे, प्रभात फेरी काढणे, प्रश्नमंजूषा कार्यक्रमात गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांची बैठक घेऊन त्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून निराकरण करण्यात आले.
1 वर्षांपेक्षा कमी बालकांसाठी रांगण स्पर्धा, राष्ट्रीय ग्राम आरोग्य अभियान अंतर्गत अंगणवाडीतील बालकांसाठी खजूर व लाडू गुळ शेंगदाणे वाटप करण्यात आले. किशोरी संमेलनामध्ये किशोरवयीन मुली आहार व वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओ बेटी पढाओ व वाहतूकीचे नियम या विषयी माहिती देण्यात आली.
बालकांसाठी सेविकांकडून गाव सहल आयोजित करून बालकांना मंदिर, बाग, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत यांना भेटीचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी पालक सभा व सामाजिक लेखापरीक्षण, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या कार्याची महिती देऊन जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.