जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठला ‘आंतरराष्ट्रीय पुरस्कार’

पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी) -राज्यातील पहिले संतपीठ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले आहे. अल्पावधीतच संतपीठाचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झाला असून जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ या शाळेला “सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट शाळा’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती प्राचार्या मृदुला महाजन यांनी दिली.
इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्टस फ्रेटरनिटी या संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय मेगा समीट आणि शैक्षणिक उत्कृष्ठता पुरस्कार कार्यक्रमांतर्गत अयोध्या-उत्तरप्रदेश येथे दि. 12 नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी सीबीएसई बोर्डाचे सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी उपस्थित
राहणार आहेत. प्राचार्या महाजन म्हणाल्या की, सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरच संत साहित्याचे शिक्षण देऊन भारतीय संस्कृती व परंपरेची शिकवणे देणे हे संतपीठाचे वैशिष्टय आहे.
शाळेच्या वेळापत्रकामध्ये शैक्षणिक विषयांसह संत साहित्य, तबला वादन, पखवाज वादन, श्लोक, अभंग, स्त्रोत, हरिपाठ पठण, संगीत, नृत्य हे विषय मुलांना शिकवले जातात. संत नामदेव व संत ज्ञानदेव महाराज पुन:भेट सोहळा, ग्रंथ दिंडी, वाचन संस्कार, स्वच्छतेचे महत्त्व, गणेशोत्सव, कृष्ण जन्माष्ठमी, नवरात्रोत्सव आदी उमक्रमांद्वारे अध्यात्म व विज्ञान यांचा दुवा म्हणजे संत साहित्य आहे याची शिकवण मुलांना दिली जाते.
पिंपरी-चिंचवडला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. संतपीठाची इमारत उभारणीपासून शालेय अभ्यासक्रम आणि अध्यात्मिक, विज्ञानाधारित शिक्षण प्रणाली याबाबत त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते. मूल्याधिष्ठित आणि आध्यात्मिक शिक्षण प्रणाली समाजात रुजवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आदर्शवत काम संतपीठाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास वाटतो.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष व आमदार





