Jaffar Express Attack : जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला; स्फोटामुळे रेल्वे रुळावरून घसरली

पेशावर : पाकिस्तानच्या नैऋत्येकडील सिंध प्रांतात जाफर एक्सप्रेसवर पुनहा एकदा बंडखोरांनी हल्ला केला असून रेल्वेमार्गावर घडवण्यात आलेल्या स्फोटामुळे या रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत रेल्वेतील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे रुळावरून घसरल्याचे वृत्त समजताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जाफर एक्सप्रेस पेशावरकडे जात असताना सिंध प्रांतातील शिकारपूर जिल्ह्यातल्या सुलतान कोट जवळच्या सोमरवाह येथे या रेल्वेमार्गावर स्फोट घडवण्यात आला होता. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसरात पोलीस आणि निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसराची पुर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. तपास संस्थांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली असून स्फोटामागील नेमके कारण तपासले जात आहे. या स्फोटामुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
जाफर एक्सप्रेसवर यापुर्वीही झाले होते हल्ले…
क्वेट्टा ते पेशावर दरम्यान धावणाऱ्या जाफर एक्सप्रेस या रेल्वेवर यापुर्वीही अनेकवेळा हल्ले करण्यात आले होते. मार्च महिन्यात याच रेल्वेवर सर्वात भीषण हल्ला करण्यात आला होता. तर सप्टेंबर महिन्यात बलुचिस्तानमधील मास्तंग भागातल्या दाश्त भागात रेल्वेमार्गावर घडवण्यात आलेल्या स्फोटामुळे एका डब्याचे मोठे नुकसान झाले होते. आणि ६ डबे रुळावरहून घसरले होते. या स्फोटात १२ प्रवासी जखमी झाले होते.
ऑगस्ट महिन्यातही या रेल्वेवर झालेल्या गोळीबारामुळे ४ प्रवासी जखमी झाले होते. त्यापुर्व ४ ऑगस्ट रोजी या रेल्वेच्या पायलट इंजिनवर कोलपूर येथे गोळीबार झाला होता. तर जून महिन्यातही जेकोबाबाद येथे स्फोट झाल्याने रेल्वे रुळावरून घसरली होती. बलुच लिबरेशन आर्मीने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. दिनांक ११ मार्च रोजी जाफर एक्सप्रेसचे अपहरण करण्यात आले होते. सुरक्षा रक्षक आणि बंडखोरांमधील चकमकीत २६ सुरक्षा रक्षक आणि ३३ दहशतवादी ठार झाले होते. नंतर या रेल्वेतील ३५४ जणांची सुटका करण्यात आली होती.





