जान सलामत तो मॅचेस पचास (बोला बिनधास्त)

संपूर्ण जगाला वेठीस धरणार्या कोरोना विषाणूचा प्रभाव जगभरातील क्रीडाविश्वावर देखील पडला आहे. ऑलिम्पिक, युरो चषक, कोपा अमेरिका, विम्बल्डन अशा महत्त्वाच्या क्रीडास्पर्धा कोरोना विषाणूच्या थैमानामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसान सोसावे लागले तरी हरकत नाही परंतु परिस्थिती हाताबाहेर जाण्यात आपला हातभार नको अशी भूमिका सर्वच देशांनी घेतली आहे.
भारतात मात्र आयपीएल तसेच T- 20 स्पर्धांच्या बाबतीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जगावर एवढे मोठे संकट आलेले असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ निर्णय घेण्याबद्दल इतका कोणता विचार करत आहे, हे एक कोडेच आहे.
भारतात आयपीएल स्पर्धा साधारण तेरा वर्षांपूर्वी सुरु झाल्या तर T-20 स्पर्धा २००५-०६ च्या दरम्यान सुरु झाल्या. T- 20 आणि आयपीएल या दोन्ही स्पर्धांना भारतीय क्रिडाप्रेमींनी भरघोस प्रतिसाद दिला. या स्पर्धांमध्ये प्रसिद्ध कलाकारांच्या सहभागामुळे या स्पर्धांना ग्लॅमर प्राप्त झाले. या स्पर्धांमागे खूप मोठा व्यवसाय आहे.
आयपीएलसाठी लागणारा सुमारे साठ टक्के पैसा हा प्रायोजकांकडून येतो. २०१६ सालच्या आकडेवारीनुसार, फक्त तिकिटविक्रीतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मिळालेली रक्कम सुमारे १६० करोड इतकी आहे. आयपीएल स्पर्धांचा गेल्यावर्षीचा व्यवसाय सुमारे चौतीस हजार करोड इतका आहे. तर प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यामागे क्रिकेट नियामक मंडळाची साधारण सत्तर करोड रुपये इतकी मिळकत आहे. आयपीएल तसेच T-20 सामन्यांवर लावला जाणारा सट्टा, तिकिटविक्री, सामन्यांवर अवलंबून असलेले इतर व्यवसाय, गुंतवणूकदार या सगळ्याचा विचार करता क्रिकेट व्यवसाय हा प्रचंड मोठा असल्याचे दिसून येते. या वर्षीचे आयपीएल सामने रद्द झाल्यास साधारण चार हजार करोड रुपयाचे नुकसान होईल, असा दावा बिजनेस टूडेकडून करण्यात आला आहे.
व्यवसायासोबतच भारतीयांचे क्रिकेटप्रेम लक्षात घेता या स्पर्धा रद्द झाल्यास क्रिकेटप्रेमी नाराज होतील हे मात्र नक्की. देशभरातील लॉकडाउन, हवाई प्रवासावरील बंदी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय सामने सध्या घेणे शक्य होणार नाही. तसेच या स्पर्धांमुळे खेळाडूंच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. कोरोनाच्या धोक्यासोबतच आर्थिक बाजू लक्षात घेता सध्या या स्पर्धा रद्द करणे शहाणपणाचे ठरेल. या स्पर्धा पुढे ढकलल्यास पुढच्या वर्षांची या स्पर्धांची वेळापत्रके विस्कळीत होऊ शकतात. त्यामुळे या वर्षीच्या स्पर्धा न घेणेच योग्य ठरेल. शेवटी “जान सलामत तो मॅचेस पचास”.
– वैष्णवी सविता सुनिल,
कॉलेज रिपोर्टर,
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.





