Sunil Tatkare : गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत दोन्ही पक्षांकडून कोणतेही वक्तव्य समोर येत नव्हते. त्यामुळे विलिनीकरणाचा विषय थांबला असल्याची चर्चा सुरू होती. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी विलिनीकरणावर मोठं वक्तव्य केले असून, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे विलिनीकरबाबत वक्तव्य सुनील शेळके यांनी केले होते. सुनील शेळके यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलाना भूमिका स्पष्ट केली. सुनील शेळके नेमकं काय म्हणाले? दैनंदिन कामकाज करताना अजित दादांची उणीव पावलोपावली भासत आहे. दादांच्या निधनानंतर शरद पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांची दादांशी चर्चा झाली असून, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत होते. दादांचे उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सन्मान मिळायला हवा, ही भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडली असून ती योग्यच आहे. पुढे बोलताना सुनील शेळके म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा एकदा एकसंघ आणि मोठा होईल. ज्यांना पक्षाचे हित हवे आहे, ते सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व नक्कीच मान्य करतील. विलिनीकरणाचा मागे पडलेला विषय पुन्हा एकदा सुनील शेळके यांनी पुढे आणला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावे लागणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केले आहे. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके पुणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आणि तरुण आमदार आहेत. अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने काम केले आहे. मोठ्या फरकाने ते मावळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी जी भावना व्यक्त केली ती व्यक्तिगत होती की त्यांच्याकडे यासंदर्भातील माहिती होती, मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. हेही वाचा : Viraj Jagtap : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ, नेमकं काय घडलं?