नवी दिल्ली – भारतात आता सगळीकडेच लसटंचाईची ओरड सुरू आहे. राज्यांबाबत दुजाभाव केला असल्याचा आरोप होत असून त्यावरून राजकारण तापले आहे. त्याचदरम्यान आपण नक्की किती लस तयार करू शकू आणि किती दिवसांत सगळ्यांना लस मिळेल असा प्रश्न विचारला जातो आहे. तसेच देशात गरज असताना बाहेर लस का निर्यात केली जात आहे त्यावरूनही गदारोळ माजला आहे. अशा स्थितीत ऑक्स्फर्ड ऍस्ट्रोजेनकाच्या लसीचे भारतात उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सध्या भारतात 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. आत्ता सर्वांसाठी लस उपलब्ध करून देणे वाटते तेवढे सोपे काम असणार नाही, असे अदर पूनावाला यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आपल्याकडचे लसीचे उत्पादन आणि त्याची उपलब्धता लक्षात घेणे आवश्यक आहे. सगळ्यांना लस उपलब्ध करून दिली, तर ज्यांना लसीची सगळ्यात जास्त गरज आहे, त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सगळ्यांना लस उपलब्ध करून देणे सोपे नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आणि इतर देशांची लोकसंख्या यांची तुलना होऊ शकत नाही. पण त्याच वेळी सरकारच्या दृष्टीने लसीची आवश्यकता असलेल्या सर्व गरजू गटांमध्ये योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. त्यामुळे लस सगळ्यांना उपलब्ध करून द्यायला हवी का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. कारण या प्रश्नाला आजच्या परिस्थितीमध्ये कोणतेही बरोबर किंवा चुकीचे उत्तर नाही. खुल्या बाजारामध्ये लस उपलब्ध करून द्यायला हवी की नको? माझे वैयक्तिक मत असेल हो. पण सरकार आणि देशातील गरीबांच्या दृष्टीने त्याचं उत्तर नाही असेल, असेही ते म्हणाले.