पिंपरी – उद्योगनगरीसोबतच आयटी हब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील आयटीयन्स सध्या ऑनलाइन ठगांच्या निशान्यावर आहेत. रोज मोठ्या संख्येने ऑनलाइन ठग आयटीयन्सच्या नंबरवर कॉल आणि मेसेज करुन नोकरी आणि टास्कच्या नावाखाली फसवणुकीचे जाळे टाकत आहेत. यातील बहुतेक कॉल, मेसेज आणि ई-मेल परदेशातून येत असल्याचे दिसून येत आहे. काही आयटीयन्स यात फसले असून लाखो रुपये गमावून बसले आहेत. याबाबत आता आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आयटीयन्समध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
आयटी क्षेत्रात नोकरी बदलल्यास वेतनात वाढ आणि पदोन्नती मिळते. त्यामुळे आयटीयन्स नोकरी बदलासाठी इच्छुक असतात. तसेच सातत्याने ऑनलाइन असणाऱ्या आयटीयन्सला वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमविण्याचे आमिष दाखवून टास्कच्या नावाने देखील फसवणूक केली जाते. यात महत्त्वाची बाब म्हणजे आयटीयन्सला येणारे बहुतेक कॉल आणि मेसेज हे व्हिएतनाम, फिलिपिन्स, बांग्लादेश, अझरबैजन, नाइजेरिया या देशांमधून येत आहेत. आपल्याच क्षेत्रात रमणारे आयटीयन्स वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांपासून अनभिज्ञ राहत असल्याने ते अगदी सहजरित्या सावज बनतात.
ऑनलाइन टास्कच्या नावाखाली फसवून मोठी रक्कम वसूल करणारे ठग प्रामुख्याने आयटीयन्सला निशाना बनवित आहेत. उच्चशिक्षित असणारे आणि बदलत्या तंत्रज्ञानासोबत चालणारे आयटीयन्स अगदी सहजरित्या यांच्या जाळ्यात अडकत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऑनलाइन ठग आयटीयन्सला फसविताना पार्ट टाइम जॉब, वर्क फ्रॉम होम, लाइक्स अँड रिव्ह्यू अशा ऑफर देत आपल्या जाळ्यात ओढतात. भरपूर पगार मिळत असूनही अजून पैशांच्या हव्यासापोटी काही जण फसतात तर काही जणांना परदेशात नोकरीचा मोह आवरता येत नाही. सविस्तर माहिती न घेता परदेशातील नोकरीच्या मोहात ते अगदी सहजरित्या या अडकतात आणि लाखो रुपये गमावून बसतात.
मूनलाइटिंगचा हव्यास सुटेना
करोनाकाळात बहुतेक सर्वच जण वर्क फ्रॉम होम करत होते. वर्क फ्रॉम होमची नवी संकल्पना रुजत असतानाच मूनलाइटिंग हा शब्द घोंघावू लागला. मूनलाइटिंग अर्थात एकाच वेळी एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये काम करुन दोन किंवा त्याहून अधिक ठिकाणाहून पगार मिळविणे. त्यावेळी वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने अनेकांनी मूनलाइटिंगचा आनंद घेतला. जेव्हा मूनलाइटिंगचा प्रकार लख्ख प्रकाशात आला तेव्हा अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. परंतु अजूनही अनेकांना मूनलाइटिंगचा हव्यास सुटत नाही. ऑनलाइन ठगांकडून नोकरीसाठी येणाऱ्या ऑफर या वर्क फ्रॉम होम आणि तुमच्या वेळेनुसार अशा असल्याने सध्या सुरू असलेली नोकरी करत-करत हे करता येईल, असा विचार करुन आयटीयन्स फसवणुकीचे बळी पडताहेत. यातील बहुतेक कॉल, मेसेज आणि ई-मेल परदेशातून येत असल्याने पुढील कारवाईलाही मर्यादा येतात.
नुकसानदायक खेळ
कोणत्यातरी व्हिडीयो, पोस्टला लाइक करुन अथवा रिव्ह्यू देऊन पैसे कमवा, अशा ऑफर देखील मिळत असतात. त्याचप्रमाणे ऑनलाइन टास्कच्या नावाखाली वेगवेगळ्या स्टेज पार करत पैसे लावून पैसे कमविण्याची स्कीम सांगितली जाते. सुरुवातीला सर्व काही छान असते, परंतु एकदा या जाळ्यात अडकले की लाखो रुपये जातात. अशा या आर्थिक दृष्ट्या नुकसानदायक खेळांमध्ये देखील आयटीयन्स गुंततात. जेव्हा मोठी रक्कम खात्यातून गेलेली असते तेव्हा त्यांचे डोळे उघडतात. जर फसवणुकीची रक्कम मोठी असेल, तर पोलिसांकडे धाव घेतली जाते आणि लहान असली तर अद्दल घडली असे समजून शांत बसतात.