पहिल्यांदाच एखाद्या देशाने ‘चॅट जिपीटी’वर बंदी घातली; जाणून घ्या कोणत्या देशाने केली कारवाई आणि का ?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट चॅट जिपीटीवर (ChatGPT) इटली सरकारने नुकतीच बंदी घातली आहे. कोणत्याही देशात चॅटजीपीटीवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फ्रेंच विद्यापीठाने चॅटजीपीटीच्या वापरावर बंदी घातली होती. हा चॅटबॉट लोकांच्या वैयक्तिक माहिती आणि गोपनीयतेशी खेळत असल्याचे इटलीच्या डेटा संरक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बंदी का?
इटलीचे डेटा संरक्षण अधिकारी म्हणतात की, त्यांना एआय मॉडेलशी संबंधित गोपनीयतेची चिंता होती. नियमकांनी सांगितले की ते “तत्काळ प्रभावाने” ओपन एआय (Open AI) वर बंदी घालतील आणि तपास करतील. इटालियन सरकारचे म्हणणे आहे की हा चॅटबॉट लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करत आहे, जे योग्य नाही आणि नियमांचे उल्लंघन आहे.
तसेच, चॅट जिपीटीमध्ये किमान वय पडताळणीसाठी कोणताही पर्याय नाही, ज्यामुळे अल्पवयीनांना संवेदनशील माहिती देखील मिळू शकते आणि त्यांच्या विकासावर आणि जागरूकतेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. चॅट जिपीटी यूएस स्टार्ट-अप ओपन एआय (Open AI) द्वारे तयार केले गेले आहे आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) द्वारे सपोर्ट केले गेले आहे. डेटा संरक्षण अधिकार्यांचे म्हणणे आहे की चॅटजीपीटी प्रथम लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करते आणि नंतर ती स्वतःच्या माहितीनुसार वापरते. हा लोकांच्या गोपनीयतेशी खेळ आहे.
* ओपन एआयने स्पष्टीकरण दिले
चॅट जिपीटी तयार करणाऱ्या ओपन एआय या कंपनीनेही इटालियन डेटा प्रोटेक्शन अधिकाऱ्यांच्या आरोपांवर एक स्टेटमेंट दिले आहे. ओपन एआयने सांगितले की ते गोपनीयता कायद्यांचे पालन करतात. एआय टूलला प्रशिक्षण देण्यासाठी लोकांच्या वैयक्तिक माहितीचा कमीत कमी वापर करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने अहवाल दिला आहे की इटालियन डेटा संरक्षण नियामकाच्या विनंतीवरून इटलीमधील वापरकर्त्यांसाठी चॅट जिपीटी बंद केले आहे. मात्र आम्ही लवकरच परत येऊ, अशी खात्री कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ट्विट करून दिली आहे.
ऑल्टमनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “नक्कीच आम्ही इटालियन सरकारपुढे नतमस्तक झालो आहोत आणि आम्ही इटलीमध्ये चॅट जिपीटी बंद केले आहे. पण आम्ही सर्व गोपनीयता कायद्यांचे पालन करत आहोत. इटली माझ्या आवडत्या देशांपैकी एक आहे आणि आम्ही लवकरच परत येऊ.”
* यापूर्वी फ्रान्स विद्यापीठाने चॅटजीपीटीवर बंदी
फ्रान्सच्या सर्वोच्च विद्यापीठांपैकी एक असलेल्या ‘सायन्स प्रो’ने या वर्षी जानेवारीमध्ये चॅट जिपीटीच्या वापरावर बंदी घातली. चॅटजीपीटीच्या मदतीने ऑनलाइन फसवणूक आणि मूळ मजकूर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, असे कारण विद्यापीठाने दिले होते. चॅटजीपीटी वापरणाऱ्यांना विद्यापीठातून काढून टाकले जाऊ शकते आणि त्यांच्या उच्च शिक्षणावरही बंदी घातली जाऊ शकते, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.





