रोम : इटलीतील मातेरा शहरात झालेल्या एका रस्ते अपघातात ४ भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रोम येथील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. हे सर्वजण ७ आसनी रेनॉल्ट सेनिक वाहनातून चालले होते. त्यावेळी या वाहनामध्ये अन्य ६ जण देखील होते. शनिवारी ऍग्री व्हॅली येथे जात असताना स्कॅन्झानो जोनिको महापालिकेतील मातेरो शहराच्या हद्दीमध्ये या वाहनाची धडक एका ट्रकला बसली होती, असे इटलीतील वृत्तसंस्थेने आपल्या बातमीमध्ये म्हटले आहे. मनोज कुमार (३४), सुरजीत सिंग (३३), हरविंदर सिंग (३१) आणि जसकरण सिंग (२०) अशी मृतांची नावे आहेत. दक्षिण इटलीतील मातेरा शहरातल्या चौघांच्या अपघाती मृत्यूबद्दल भारतीय दूतावासाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अफगाताबद्दलचा अन्य तपशील इटलीतील स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या सर्वांच्या कुटुंबियांना वाणिज्य दूतावासाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही दूतावासाने म्हटले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या अन्य पाच जणांना पोलिकोरो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्या सहाव्या व्यक्तीला पोतेन्झा येथील सॅन कार्लो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ट्रकच्या चालकाला कोणतीही इजा झाली नाही. मातेरा पोलिसांच्यावतीने या अपघाताचा तपास केला जातो आहे.