पुणे – सोमवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात छोटे व्यावसायिक आहेत. त्यांना लहान रस्ते, वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंगसह इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येणार, अशीची ग्वाही महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील कांबळे यांनी दिली.
शुक्रवारी या भागातील मतदारांशी त्यांनी पदयात्रेद्वारे संवाद साधला. यावेळी या व्यावसायिकांनी आपल्या अडचणी कांबळे यांच्यासमोर मांडल्या, तर काही व्यावसायिकांनी त्यांना या समस्या सोडविण्यासाठीचे उपायही सुचविले. ही सर्व माहिती त्यांनी समजून घेत उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले.
त्रिशुंड गणपतीपासून सुरू झालेली ही पदयात्रा खडीचे मैदान, दारूवाला पूल, दत्त क्लब, पॉवर हाऊस, कमला नेहरू रुग्णालय, गोगावले मठ भागातून पुढे गेली. पदयात्रेचा समारोप शिवाजी आखाडा परिसरात करण्यात आला. नगरसेवक योगेश समेळ, गणेश बीडकर, सदानंद शेट्टी, पोपटराव गायकवाड, कल्पना बहिरट, मामा बहिरट, संजय ओझा, मामा शिवले, गणेश यादव, यांच्यासह भाजप-शिवसेना, रिपाइं (ए)चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान, अनेक व्यावसायिकांनी कांबळे यांचे जोरदार स्वागत केले. त्यात दुकानदारांसह, सामान्य नागरिक आणि महिला मतदारांची संख्याही लक्षणीय होती. मोठे व्यावसायिक, छोटे दुकानदार, हातगाडीवाले, फळविक्रेते, किराणा मालाचे दुकानदार अशा सर्वांच्या भेटी घेत कांबळे यांच्याशी संवाद साधत, विजयी होण्यासाठी शुभेच्छा आणि पाठिंबाही दिला.
कांबळे यांच्या विजयाची खात्री – बिडकर
सोमवार पेठेतील नागरिकांना सातत्याने गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आता सुनील कांबळे यांच्या रूपाने कॅन्टोन्मेंटला नव्या दमाचा चेहरा मिळणार आहे. त्यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री आहे, असा विश्वास भाजपचे सरचिटणीस गणेश बिडकर यांनी केला. तसेच जास्तीत जास्त मतांनी कांबळे यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.