“आझाद मैदानातून हुसकून लावल्यास महागात पडेल”; जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Mumbai Morcha | मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मात्र दक्षिण मुंबईत भटकंती करणाऱ्या मराठा आरक्षण समर्थकांना वैधानिक मागणीसाठी मुंबई ठप्प करून लोकांची गैरसोय करण्याचा अधिकार नसल्याचे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हंटले.
तसेच, गेल्या तीन दिवसांपासून विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मुंबईकरांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील रस्ते, रेल्वे आणि बस स्थानक मोकळे आणि स्वच्छ करण्यास बजावले. न्यायालयाच्या निर्देशांनंतर मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आझाद मैदान रिकामे करावे, असेही आदेशात म्हटले आहे. आझाद मैदान पोलिसांनी याबाबतची नोटीस जारी केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, “गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शांतता मार्गे आंदोलन करत आहोत. कायद्याच्या चाैकटीत राहून आमचे आंदोलन सुरू आहे. कोर्ट हे आंदोलनाच्या बाजूने न्याय करेल, अशी आशा आम्हाला आहे. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहने हटवली आहेत. आता मुंबईत कुठेही वाहतूककोंडी नाही. आम्हाला 100 टक्के न्याय मिळणार आहे.”
मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही
यानंतर आता मनोज जरांगे यांनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुम्ही काहीही निमित्त काढून आझाद मैदानातून हुसकून देताल, तर हे तुम्हाला महागात पडेल. सरकाराने आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन किंवा अजून कुठेही जाऊन काहीही केले तरीही मी सरकारला आणि फडणवीसांना सांगतो की, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, या जीआरशिवाय मुंबईत सोडत नाही. सगळ्या मागण्याची हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थान गॅजेट याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई आम्ही सोडणार नाही.”
….नाही तर देवेंद्र फडणवीसांना दाखवून देऊ
शिंदे समितीने दस्तावेज शोधणे गरजेचे आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीत काय अडचण आहे ते सांगा. सर्व आंदोलकांनी नियमांचे पालन करा, यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या माध्यमातून पोरांवर लाठीचार्ज करण्याचा विचारही करू नये. नाही तर देवेंद्र फडणवीसांना दाखवून देऊ मराठा काय आहेत. आम्ही शांत आहोत शांततेत मार्ग काढून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. सन्मान केला तर फडणवीस तुम्हाला गरीब लोक कधी विसरणार नाही. जर तुम्ही अपमानित केलं तर त्यांच्या डोक्यात बदल्याची भावना राहील,” असेही म्हणत जरांगे यांनी फडणविसांवर हल्लाबोल केला.
“आम्ही शांत आहोत, देवेंद्र फडणवीस आम्हाला शांत राहू द्या. शनिवार-रविवारी मराठे जर मुंबईत आले तर सोमवारच आंदोलन खूप छान असेल. ही वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडणार नाही यावर ठाम आहे. शंभर पोलीस आले किंवा लाख पोलीस आले, तरी जेलमध्येच नेणार आहे. आम्ही जेलमध्येही उपोषण करु. पण आता सरकाला सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आंदोलकांना जरांगेंनचे आवाहन
“किती माझी तब्येत खराब झाली तरी शांत राहायचा. कितीही त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचाच आहे. मी मेल्यानंतर सुद्धा शांत रहा, ही लढाई शांततेत लढायची आहे. मी मेल्या नंतरही तुम्ही शांत राहा. कोर्टाच्या नियमाचे पोरांनी पालन करावे. न्यायदेवता आपल्यासाठी आहे, आपला आधार आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचे ते करा. ही लढाई शांततेत लढायची आणि जिंकायची. मी मरेपर्यंत हटणार नाही. हे देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतोय की, फक्त कारण करू नका,” असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.
हेही वाचा:





