मुहूर्त ठरला ! ‘या’ दिवशी चंपाई सोरेन करणार भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी अखेर पुढील राजकीय पाऊलाविषयीचा सस्पेन्स संपवला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. त्यासाठी ३० ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
चंपाई झारखंड मुक्ती मोर्चाची (झामुमो) साथ सोडणार असल्याचे याआधीच स्पष्ट झाले. मात्र, पुढील राजकीय वाटचालीविषयी त्यांनी नेमका निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे ते नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, ते देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाल्याने वेगळा विचार करत असल्याचे सूचित झाले.
अखेर त्यांनी स्वत:च दिल्लीत पत्रकारांशी बोलताना भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे उघड केले. त्यांनी सोमवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्या भेटीत चंपाई यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. त्या बैठकीवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा हेही उपस्थित होते. हिमंता हे झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी आहेत.





