अनिश्चिततेच्या काळात हवे धैर्य, संयम आणि सचोटी (भाग-१)

मला खूप पैसे कमावायचे आहेत आणि त्यासाठी मी गुंतवणूक करण्यास तयार आहे, माझी स्वतःची काही दीर्घकालिन उद्दीष्टे आहेत, उदाहरणार्थ – प्रशस्त घर, मुलांचे शिक्षण, निवृत्तीसाठी निधी. या सर्व उद्दीष्टांसाठी मला  भविष्यात मोठी संपत्ती लागणार आहे. यासाठी आजपासून मी एकरकमी व दरमहा माझ्या उत्पन्नातून दीर्घकालिन गुंतवणूक करण्यास तयार आहे. असे म्हणणारे अनेक गुंतवणूकदार मला सतत भेटत असतात. दीर्घकालिन गुंतवणूक म्हणजे काय? शेअर बाजारात काही वर्षे परतावा मिळाला नाही तर काय करायचे? मी गुंतवणूक करत असलेल्या योजनेमध्येच परतावा मिळत नाही?असे अनेक प्रश्न बहुतेक गुंतवणूकदारांना सतत पडत असतात.

२०१८-१९ या वर्षात शेअर बाजार वाढला पण म्युच्युअल फंडातील बहुतांश योजनांमध्ये परतावा मिळालेला नाही. देशात सध्या सुरु असलेले निवडणुकीचे वारे, चीन-अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध, तेलाच्या वाढत्या किंमती, वाढणारी महागाई, बाजारात मागणीची कमतरता, जमिनीचे पडणारे भाव, गेल्या सात-आठ वर्षात न वाढलेले सोन्याचे भाव अशा अनेक बाबींची चिंता गुंतवणुकदाराला सतावत आहे. असे असले तरी गुंतवणुकदाराने हे विसरून चालणार नाही की, शेअर बाजार हा प्रत्येक घटनेचे पडसाद स्वीकारत पुढे जात असतो. परंतु देशाची अर्थव्यवस्था मूलभूत पातळीवर मजबूत असेल आणि देशातील औद्योगिक उत्पादन व बाजारपेठांमधील मागणीत सातत्य असेल तर निश्चितच भविष्यात अर्थव्यवस्था वाढणार असते. सध्या भारत ६.६ टक्के दराच्या वेगाने वाढत आहे. यामुळे १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात स्वतःची अशी एक मागणी आहे आणि गेल्या अनेक वर्षात देशात झालेल्या अनेक स्थित्यंतरामुळे नागरिकांचे उत्पन्न सतत वाढत आहे. त्यामुळे सातत्याने नवनव्या वस्तूंची व सेवांची मागणी वाढत आहे.

जरी मागील एक वर्षात गुंतवणुकीमध्ये परतावा दिसत नसला तरी भारत हा वेगाने वाढणारा देश असल्याने निश्चितच भविष्यात गुंतवणुकीवर मोठा परतावा निर्माण होणार आहे. अनेक वेळा असे लक्षात येते की, म्युच्युअल फंडाच्या योजनेचा परतावा व गुंतवणूकदाराला मिळालेला परतावा हा वेगवेगळा असतो. असे का  घडते हे पाहणे आवश्यक आहे. कोणत्याही शेअर बाजारातील तेजी आणि मंदी या चक्रातून बाजाराची वाटचाल होत असते. अनेक वेळा हा तेजी आणि मंदीचा काळ मोठा अथवा छोटा असू शकतो. उदाहरणार्थ २००३ ते २००७ या काळात मोठी तेजी अनुभवयास आली आणि या तेजीच्या काळानंतर २००८-०९ या वर्षात मंदी अनुभवयाला लागली.  अनेक वेळा बाजार विविध संक्रमणातून जात असतो. देशातील व देशाबाहेरील राजकीय परिस्थिती, व्यापाराची परिस्थिती, जागतिक घडामोडी, वस्तू आणि सेवा यांच्या मागणीत होणारे बदल याबाबतच्या सरकारच्या बदलणाऱ्या नियम व अटी, पैशांची व गुंतवणुकीची होणारी वाढ वा घट अशा विविध बाबींमुळे भविष्यातील परतावा ठरत असतो.

अनिश्चिततेच्या काळात हवे धैर्य, संयम आणि सचोटी (भाग-२)

बदलत्या शेअर बाजारातील आकड्यांमुळे आणि वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमुळे गुंतवणूकदार आपले गुंतवणूक नियोजन सातत्याने बदलत असतात. निश्चितच परिस्थितीचा आढावा घ्यावयास हवा परंतु हे करताना आपली दीर्घकालिन उद्दीष्टे विसरून जाऊ नयेत या उद्दीष्टांसाठी गुंतवणुकीमध्ये आपला काळ जास्तीत जास्त  लांबचा असणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.