Aakash Chopra on Rishabh Pant’s Exclusion from T20I Team : भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला टी-20 आंतरराष्ट्रीय संघातून पूर्णपणे वगळण्यात आल्याची चर्चा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर केली आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा विजयाचा भाग असलेला पंत हा त्या स्पर्धेत भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तरीही, गेल्या 13 महिन्यांपासून त्याला एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. ऋषभला जणू दूधातून माशी काढून फेकल्यासारखे वगळलं – 2024 च्या टी-20 विश्वचषकात पंतने 171 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेत झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याने एका सामन्यात 51 धावा केल्या, तर दोन सामन्यांत त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. तरीही, टी-20 आशिया चषक 2025 च्या संघात त्याचा समावेश दिसत नाही. यावर आकाश चोप्रा यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटले, “ऋषभ पंतला जणू दूधातून माशी काढून फेकल्यासारखे वगळण्यात आले आहे. कोणीही त्याच्याबद्दल बोलत नाही, हे खूपच विचित्र आहे.” तरीही त्याच्याबद्दल चर्चा होत नाही – आकाश चोप्रा यांनी पंतच्या टी-20 आकडेवारीचा उल्लेख करत सांगितले, “पंतने जेव्हा अव्वल तीन क्रमांकांवर फलंदाजी केली, तेव्हा त्याने 156 च्या स्ट्राइक रेटने आणि 34 च्या सरासरीने धावा केल्या, जे चांगलेच आहे. क्रमांक 4 ते 7 वर त्याचा स्ट्राइक रेट 140 आणि सरासरी 30 आहे, जी तरीही ठीक आहे.” ते पुढे म्हणाले, “2024 च्या टी-20 विश्वचषकात तो तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तरीही त्याच्याबद्दल चर्चा होत नाही. कदाचित आयपीएल 2025 मधील खराब कामगिरी हे एक कारण असू शकते, पण त्याबद्दल बोललेच जात नाही, हे आश्चर्यकारक आहे.” हेही वाचा – Rahul Dravid Resigns : द्रविडने स्वतःहून पद सोडलं की हटवलं…! डिव्हिलियर्सने ‘RR’च्या निर्णयावर उपस्थित केला सवाल आयपीएल 2025 मध्ये पंतला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटींना विकत घेतले होते आणि त्याने संघाचे कर्णधारपदही भूषवले. मात्र, संघाची आणि त्याची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक राहिली. आगामी टी-20 विश्वचषक 2026 साठी संभाव्य यष्टिरक्षकांबाबत चर्चा करताना चोप्रा यांनी पंतच्या वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.