प्रभात वृत्तसेवा पुणे – जागतिक मंदी आणि पाश्चिमात्य देशातील वाढत्या संरक्षणवादाचा दुष्परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर होत असून, कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. त्याचा परिणाम पुण्यातही दिसून येत असून, शहरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. त्यात पुणे आणि एकंदरीत देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने मोठ्या प्रमाणात कामगार कपात केली असून, गेल्या काही दिवसांत फक्त पुण्यातील ३६५ कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. या कर्मचाऱ्यांपैकी तिघांनी कामगार आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे.आम्हाला पुन्हा नोकरीवर लागू करून घेण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. टीसीएसचे प्रमुख यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडून संपूर्ण देशातील सर्व ठिकाणी एकूण १२ हजारांहून अधिक नोकऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एकेकाळी जागतिकीकरणाचा फायदा घेत श्रीमंत झालेल्या देशांनी संरक्षणवादाची भूमिका घेतल्याने भारतीय आयटी क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला आहे. देशातील रोजगार निर्मिती आणि चांगल्या पगारासाठी नावाजलेल्या आघाडीच्या आयटी क्षेत्रात मंदीचे वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम थेट आता आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होत असून, गेल्या काही काळात अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याहून चिंताजनक बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांना कामाहून कमी करताना नियमावलीला धाब्यावर बसविले आहे. या कर्मचाऱ्यांना मोबदला देणे बंधनकारक असताना त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने अनेकांनी कामगार आयुक्तालयाचा मार्ग धरला आहे. प्रसूती रजेमुळे राजीनामा देण्यास भाग काही दिवसांपूर्वी टीसीएस कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याने कामगार आयुक्तालयाचे दार ठोठावले होते. प्रसूती रजा घेतल्यामुळे राजीनामा देण्यास भाग पाडले जात असल्याचे सदर कर्मचाऱ्याने म्हटले. त्यानंतर बुधवारी (दि. १८) पुण्यातील कामगार आयुक्तालयात झालेल्या सुनावणीत टीसीएस कंपनीच्या मानव संसाधन (एचआर) विभागप्रमुखाला बोलावण्यात होते. मात्र, एचआरने तिथे येऊन कोणतेही स्पष्टीकरण देण्याऐवजी महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीची प्रत घेऊन आम्ही लेखी उत्तर देऊ, असे म्हणत वेळ मारून नेली.