भाटघर -ज्या शाळेत ज्ञानाचे धडे गिरवले त्याच शाळेत क्वारंटाइन व्हावे लागेल म्हणून मुंबई-पुण्यातून लोक गावात यायला घाबरत आहेत. तर कोणी शासकीय नियमाप्रमाणे शाळेत 14 दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करून निधड्या छातीने गावात फिरत आहेत. मात्र, भोर तालुक्यातील टापरेवाडी (ता. भोर) गावातील नागरिक अमोल टापरे यांनी शाळेत राहणे पसंतच केले नाही, तर शाळेचे रूपडेही पालटून टाकले आहे. अमोल टापरे हे मुंबईहून गावाकडे करोनाच्या भीतीपोटी स्थलांतर केले असून गावच्या जिल्हा परिषद शाळेत 14 दिवसांकरता क्वारंनटाइन झाले आहेत. “”मी याच शाळेत शिकलो. नोकरीला लागलो, शहरात गेलो, क्वारंटाइनमुळे नकळत या ज्ञान मंदिराच्या स्वच्छतेचे पाईक होण्याची संधी मिळाली,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, टापरे यांनी केवळ शाळेचा परिसर स्वच्छ केला नाही तर झाडांना वाफे बनविणे, झाडांना पाणी घालणे, शाळा खोल्या धुऊन स्वच्छ करणे अशी कामे करत छोटीशी बागही फुलविली आहे. तर क्वारंनटाइन केल्याने मनाने खचून न जाता आगळेवेगळे कार्य करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे टापरेवाडी परिसरातून अमोल यांचे कौतुक होत आहे.