Mamata Banerjee | Narendra Modi – केंद्र सरकार महिलांना ढाल म्हणून वापरून मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांनी प्रामाणिकपणे संबोधित करण्याऐवजी राष्ट्राची दिशाभूल करण्याचा निर्णय घेतला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधानांनी स्वत:चे हसे करुन घेतले, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. लोकसभेत २०२९ पासून विधानमंडळात महिलांसाठी ३३% आरक्षणाचा प्रस्ताव मांडणारे विधेयक फेटाळल्यानंतर, पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर गर्भहत्येचे पाप केल्याचा आरोप केला होता आणि महिला मतदार त्यांना शिक्षा देतील असा इशारा दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी ही टिप्पणी केली. बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले की, तृणमूल काँग्रेसने महिलांना अधिक राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे सातत्याने समर्थन केले आहे. संसद आणि राज्य विधानमंडळ या दोन्ही ठिकाणी आमच्या महिला निवडून आलेल्या प्रतिनिधींचे प्रमाण सर्वाधिक आहे. लोकसभेत आमच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी ३७.९ टक्के महिला आहेत. तसेच, पक्षाने राज्यसभेत ४६ टक्के महिला सदस्यांना उमेदवारी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महिला आरक्षणाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, यावर त्यांनी जोर दिला.