चंद्रकांत दादांना हिमालयात जावं लागणार हे दु:खद; अमोल मिटकरींचा खोचक टोला

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. तसेच विजयाचे दावे करण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास आपण हिमालयात जावू, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांना ही घोषणा चांगलीच महागात पडताना दिसत असून विरोधक या मुद्दावरून टीका करत आहेत.
पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांना डिवचले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, हनुमान जयंतीच्या पवित्र दिनी कोल्हापुरमधील पराभवानंतर चंद्रकांत दादांना राजकारण सोडून हिमालयात जावे लागणार हे पाहून फार दुःख झाले. दादा तुम्ही अशी वल्गना करायला नको होती. तुमच्यामुळे राजकारणात रोज मनोरंजन होत असे, असा खोचक टोलाही मिटकरी यांनी लगावला.
कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यातच महाविकास आघाडीकडूनही चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असले तरी पुण्यातून निवडून गेले असल्याचा मुद्दा या निवडणुकीदरम्यान समोर आणण्यात आला होता. त्यानंतर कोल्हापूरमधील ही पोटनिवडणूक जिंकू अथवा हिमालयात जाऊ, प्रतिज्ञा चंद्रकांत पाटील यांनी केली होती.





