Pune District : उत्सवाची भव्यता नव्हे; समाजहिताची उंची महत्त्वाची
Pune District : रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, महिला सुरक्षा, सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन, वाहतूक नियमांची जनजागृती, शेतकरी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रमांमधून गणेशोत्सवाला सामाजिक अर्थ प्राप्त होऊ शकतो.

तळेगाव ढमढेरे : गणेशोत्सव हा केवळ दहा दिवसांचा उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारे, विचारांना दिशा देणारे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारे प्रभावी माध्यम आहे. काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलत तरी त्यामागील सामाजिक उद्देश आणि सकारात्मक विचारांची परंपरा अधिक मजबूत होणे गरजेचे आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण ‘उत्सवातून समाजासाठी काहीतरी देण्याचा’ ठरला, तर गणेशोत्सवाची खरी उंची वाढेल.
आज समाजासमोर व्यसनाधीनता, वाढती गुन्हेगारी, पर्यावरणाचा प्रश्न, महिलांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांमधील वाढता ताण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या अडचणी, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, वाहतूक शिस्त अशा अनेक समस्या आहेत. या प्रश्नांवर केवळ चर्चा करण्यापेक्षा गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती केली, तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोहोचू शकतो. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, महिला सुरक्षा, सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन, वाहतूक नियमांची जनजागृती, शेतकरी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रमांमधून गणेशोत्सवाला सामाजिक अर्थ प्राप्त होऊ शकतो. राज्यातील विविध ठिकाणी गणेशोत्सवाच्या माध्यमातून अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची उदाहरणेही दिसून येत आहेत.
गणरायासमोर एक प्रश्न…
आपण बाप्पासाठी किती खर्च केला? यापेक्षा बाप्पाच्या नावाने समाजासाठी काय केले? हा या प्रश्नाचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवातील रोषणाई, सजावट, ध्वनी, मिरवणूक यांना सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असले तरी त्याचबरोबर ‘एक उत्सव, एक सामाजिक संकल्प’ ही संकल्पना रुजली, तर दहा दिवसांचा उत्सव वर्षभराच्या सामाजिक चळवळीत बदलू शकतो.
विसर्जनानंतरही विचार जिवंत राहावा!
गणेशमूर्तीचे विसर्जन झाले की उत्सव संपतो; मात्र गणरायाने दिलेला सामाजिक संदेश संपता कामा नये. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत मिळाली, एखाद्या गरजू रुग्णाला रक्त मिळाले, एखादे झाड जगले, एखाद्या युवकाने व्यसन सोडले, एखाद्या महिलेला सुरक्षिततेचा आधार मिळाला किंवा एखाद्या नागरिकाला सायबर फसवणुकीपासून वाचण्याचे ज्ञान मिळाले—तर तोच गणेशोत्सवाचा खरा प्रसाद ठरेल.
समाजाच्या सुरक्षिततेला हातभार लावा – चंद्रशेखर यादव
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. उत्सवासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चाचा काही भाग समाजाच्या सुरक्षिततेसाठी वापरता येऊ शकतो. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देणे, सुरक्षितता वाढविणे हीदेखील सामाजिक बांधिलकीच आहे. नागरिकांमध्ये कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृती झाली, तर उत्सवाचा समाजाला दीर्घकाळ उपयोग होईल.





