‘दादागिरी फक्त राज ठाकरेंना करता येते असं अजिबात नाही…’ – रामदास आठवले

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाण्यातील ‘उत्तर सभेत राज ठाकरे यांनी चौफेर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. सध्या राज्यातील राजकारण या सभेनंतर चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांवर आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडूनही प्रतिउत्तर दिले जात आहे.
यातच या सभेवरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधला आहे. ,’राज ठाकरेंनी भोंगे काढण्याचा विषय करु नये. दादागिरी फक्त आपल्याला (राज ठाकरेंना) करता येते असं अजिबात नाही.’
ते पुढे म्हणाले,’दादगिरीला दादागिरीने सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं. त्यामुळे अशापद्धतीची भूमिका त्यांनी घेऊ नये. भोंगे काढलेच नाही तर अशाप्रकारचा धमकी वजा इशारा देणं चुकीचं आहे. याचा विचार महाराष्ट्र सरकारने करणे अत्यंत आवश्यक आहे.’
दरम्यान, रामदास आठवले यांनी मनसेवर यापूर्वीही निशाणा साधला होता. आठवले म्हणाले होते की, आपल्या भारतात भोंगे अनेक वर्षांपासून आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा मंदिरात मंदिरात भोंगे लावावे. मात्र भोंगे लावण्याच्या मुद्यावरून दोन धर्मात तणाव निर्माण करु नये. रिपब्लिकन पक्षाचा भोंगे काढण्याला विरोध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले होते.





