Chief Justice Bhushan Gavai – संविधानामुळेच एका नगरपालिका शाळेत जमिनीवर बसून शिक्षण घेणाऱ्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात उंच पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळू शकते. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांना मी आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न केला. १९८५ मध्ये मी (कायदेशीर) व्यवसायात आलो, तेव्हा मी कायद्याच्या शाळेत प्रवेश घेतला. आज, मी पद सोडत असताना, मी न्यायाचा विद्यार्थी म्हणून संस्था सोडत असल्याचे समाधान आहे, असे उद्गार सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर गवई हे सोमवारी निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी हा त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. यावेळी आयोजीत निरोप समारंभात बोलताना गवई यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. दरम्यान, के.जी. बालकृष्णन यांच्यानंतर ते दुसरे दलित आणि पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत. भूषण गवई म्हणाले, मी कोणत्याही धर्माचा सखोल अभ्यास केलेला नाही. पण हिंदू, शीख, मुस्लीम, ख्रिस्ती सर्वांवर माझा समान विश्वास आहे. ही शिकवण मला माझ्या वडिलांकडूनच मिळाली. तसेच प्रत्येक सार्वजनिक पदाकडे सत्तेचे पद म्हणून नव्हे तर समाज आणि राष्ट्राची सेवा करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालय ही केवळ मुख्य न्यायाधीश-केंद्रित संस्था नाही. हे सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि नोंदणी विभाग यांनी एकत्र येऊन चालवलेले एक मोठे कुटुंब आहे, असे ते म्हणाले.