पुणे : सिनेमा आणि शॉर्ट फिल्म प्रोड्युसर असल्याचे सांगत आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणीला ‘अल्बम सॉंग’मध्ये काम मिळेल या आमिषाने कराडला नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी २८ वर्षीय तरुणी पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत असून, अभिनयाची आवड असल्यामुळे तिने ‘ओम तेजा प्रोडक्शन’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन केला होता. याच ग्रुपमधून विशाल दीपक (रा. कराड, जि. सातारा) या व्यक्तीने संपर्क साधला. अल्बम सॉंगसाठी शुटिंग करायचे असल्याचे सांगून त्याने फिर्यादीला कराडला बोलावले. शुटिंगच्या बहाण्याने अत्याचार ७ जून २०२५ रोजी पीडिता कराडला गेल्यानंतर दोन दिवस विविध ठिकाणी शुटिंग झाले. मात्र ९ जूनच्या संध्याकाळी आरोपीने तिला शुभम रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे कोणी नसल्याचा फायदा घेत तिला जबरदस्ती करून बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद आहे. धमक्या व पाठलाग पुण्यात परतल्यानंतर आरोपीने पीडितेला सतत फोन, मेसेज करून भेटण्याचा तगादा लावला. “भेटली नाहीस तर बदनामी करीन, व्हिडीओ व्हायरल करीन” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे, तर १७ ऑगस्ट रोजी पुण्यात तिच्या कामाच्या ठिकाणी जात असताना आरोपीने तिचा पाठलागही केला. घाबरलेल्या पीडितेने पोलिसांना कॉल करून तक्रार नोंदवली. गुन्हा कराड पोलिसांकडे वर्ग या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी कराड पोलिसांकडे वर्ग केला आहे. आरोपीविरोधात बलात्कार, धमकी आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर गुन्हे नोंदवले गेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.