Chhaava Movie | Amol kolhe | shirke family : सध्या देशभरात ‘छावा’ चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. छावा चित्रपटाला रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भरभरून कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विक्की कौशलचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. संपूर्ण जगभर छावा माहोल तयार झाला असून प्रेक्षकांची पाऊल थिएटर्सकडे वळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मात्र या सिनेमावरून काही वाददेखील उफाळून आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना औंरगजेबाने कैद करुन अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली. गणोजी आणि कान्होजी यांनी फितुरी केल्यामुळं संभाजी राजे औंरगजेबाच्या हाती लागले, असं चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मात्र, चित्रपटातील याच दृश्यावरुन वाद निर्माण झाले आहेत. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या वंशजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात न्यायालीयन लढाईला सुरुवात करत असल्याचा घेतला निर्णय त्यांनी घेतला आहे. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणे आक्रमक झाले आहेत. यावरच आता अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी आपलं मत मांडलं आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, “त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा काळ या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेंना अद्दल घडवली का? बाजी घोरपडेंना मुधोळमध्ये जाऊन त्यांना शासन दिलं की नाही? पण म्हणून घोरपडे फितूर होतात का? नंतर माळोजी घोरपडेंनी छत्रपती संभाजी महाराज पकडले जात असताना बलिदान दिलंय. त्यामुळे कुठल्या काळामध्ये कुठला निर्णय घेतला गेला याविषयी त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करायला हवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याकडे आपण जोपर्यंत मानवी स्वभावाच्या दृष्टीकोनातून पाहत नाही, तोपर्यंत आपण इतिहासाकडे फक्त अभिनिवेषातून पाहतो. तर मग आपण इतिहास मांडूच शकणार नाही. त्यावेळी जे घडलं होतं, त्याला काहीतरी कारणं असतील. त्या गोष्टी झाल्या म्हणून आतासुद्धा ते फितूर आहेत का, असा अर्थ होत नाही..’ असं यावेळी अमोल कोल्हे म्हणाले आहेत.