अवघ्या २५ दिवसाचा संसार करणाऱ्या आयटी दांपत्याचा घटस्फोट

पुणे – स्वभाव, राहणीमान तफावतीमुळे लग्नानंतर अवघ्या २५ दिवसातच वेगळे राहणाऱ्या दांपत्याचा घटस्फोट दोन तारखांमध्ये झाला. २६ सप्टेंबर रोजी दाखल केलेला दावा दुसऱ्या तारखेला ४ अॉक्टोबर रोजी निकाली काढण्यात आला.
कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस.एस.रुकमे यांनी हा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो.
मात्र, या प्रकरणात दोघे सुमारे १ वर्षे वेगळे राहत आहेत. न्यायालयात झालेल्या समुपदेशनात दोघे एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी अॅड. मंगेश कदम आणि अॅड. सुमेद जोगदंड यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघेही आयटी क्षेत्रात इंजिनिअर आहेत. तो २७ तर ती २६ वर्षांची आहे. पारंपारिक पध्दतीने पाहणी करून ७ जुलै २०२४ रोजी दोघांचा विवाह झाला. मात्र, वैचारिक मतभेदामुळे दोघांचे पटेनासे झाले.
२५ दिवस संसार केल्यानंतर वाद विकोपाला गेल्याने दोघे वेगळे राहू लागले. आता एकत्र येणे शक्य नसल्याने दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयात झालेल्या समुपदेशनात दोघे एकत्र येणे शक्य नसल्याने निष्पन्न झाले. त्यामुळे घटस्फोटाचा दावा न्यायालयाने मंजुर केला. निकालानुसार दोघात स्त्रीधन, इतर दागदागिने, पैसे आणि संसार उपयोगी साहित्यावरून कोणतेही वाद नाहीत.





