IT companies Shares : सलग पाचव्या दिवशी आयटी कंपन्यांचे शेअर घसरले

IT companies Shares : अमेरिकेने एच- 1 बी व्हिसाचे शुल्क 5 हजार डॉलरवरून एक लाख डॉलर केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज सलग पाचव्या दिवशी घट झाली.
शुक्रवारी ओरॅकल फायनान्शिअल सर्विसेस कंपनीचा शेअर 4.43 टक्क्यांनी, झेन्सर टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर 3.59 टक्क्यांनी, हेक्झावेअर कंपनीचा शेअर 2.88 टक्क्यांनी, विप्रो कंपनीचा शेअर 2.60 टक्क्यांनी, टेक महिंद्रा कंपनीचा शेअर 2.52 टक्क्यांनी, इन्फोसिस कंपनीचा शेअर 2.43 टक्क्यांनी, टीसीएस कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी, एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी कोसळला. अशा परिस्थितीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 2.41 टक्क्यांनी कमी होऊन 33,337 अंकावर बंद झाला.
बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात गेल्या आठवड्यापासून वेगाने घट होत आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांचे बाजार मूल्य या कालावधीत 1.90 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. एच- 1 बी व्हिसावर अमेरिकेत जे कर्मचारी जातात त्यातील 70 टक्के कर्मचारी भारतातील असतात. अशा परिस्थितीत भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या अमेरिकेतील कामकाजावर याचा नकारात्मक परिणाम होणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट होत आहे.
याच कारणामुळे शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक सध्या तीन आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आहेत. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 733 अंकांनी कोसळून 80,426 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 236 अंकांनी म्हणजे 0.95 टक्क्यानी कोसळून 24,654 अंकावर बंद झाला.

