इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी इराणवर जोरदार टीका

वॉशिंग्टन : इस्रायलविरोधात लढणाऱ्यांना आणि लढण्यासाठी वित्तपुरवठा केल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी इराणवर जोरदार टीका केली आहे. घातक शत्रूंना पराभूत करण्यासाठी धाडस आणि स्पष्टता या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला नेतान्याहू यांनी आज संबोधित केले. संसदेतल्या आपल्या भाषणात त्यांनी इस्रायलविरोधात निदर्शने करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. इस्रायलविरोधात अपप्रचार करणारे इराणसाठी उपयुक्त मूर्ख असल्याचे ते म्हणाले.
इस्रायलविरोधातल्या निदर्शनांना इराण पैसा पुरवत आहे. अशी निदर्शने अमेरिकेच्या संसदेबाहेर देखील होत आहेत. इराणच्या जुलमी राजवटीने लोकांना भर चौकात फाशी दिले आहे. हिजाब न घातल्याने महिलांची हत्या केली आहे. त्या इराणने दिलेल्या पैशाच्या जोरावर आणि चिथावणीमुळे निदर्शने करणारे लोक इराणचे उपयुक्त मूर्ख आहेत, असे नेतान्याहू म्हणाले. या निदर्शकांसाठी इस्रायल म्हणजे वसाहत आहे. मात्र इस्रायलचे पूर्वज याच ठिकाणचे होते, ते येथेच लढले. त्यांनी येथेच राज्य केले आणि आपली शिकवणही त्यांनी येथूनच दिली, हे त्यांना माहीत नाही का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
सध्या मध्यपूर्वेमध्ये इराण दहशतवाद, अराजकता, गोंधळ आणि हत्या पसरवत आहे, असा आरोपही नेतान्याहू यांनी केला. यात काहीही आश्चर्य देखील नाही. कारण आयोतोल्ला खामेनी यांनी इराणची स्थापना करतानाच सर्व जगभरातइस्लामी क्रांती घडवण्याची प्रतिज्ञा केली होती. जगावर कट्टरवादी इस्लामची शिकवण लादण्याच्या इराणच्या प्रयत्नांना अमेरिकाच विरोध करत आहे. म्हणूनच इराण अमेरिकेला आपला सर्वात मोठा शत्रू मानत आहे, असेही ते म्हणाले. नेतान्याहू यांनी आपल्या भाषणात हमासवर निर्णायक विजय मिळवण्याचा विश्वास देखील व्यक्त केला. हमासवरच्या या विजयासाठी इस्रायलला शस्त्रे आणि दारुगोळ्याची मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी अमेरिकेतील संसद सदस्यांना केले.





