गाझा सिटी – इराणमध्ये इस्रायलने अमेरिकेसोबतचा संयुक्त बॉम्बहल्ला थांबवल्यापासूनच्या पाच आठवड्यांत आता इस्रायलने गाझामधील आपले हल्ले तीव्र केले आहेत. गाझाच्या काही भागांमध्ये हमासचे योद्धे पुन्हा आपली पकड घट्ट करत असल्याचा दावा करत इस्रायलने या भागात पुन्हा हल्ले करायला सुरुवात केली आहे. दिनांक ८ एप्रिल रोजी झालेल्या युद्धविरामानंतर गाझामध्ये आठ महिला आणि १३ मुलांसह १२० पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. इस्रायल इराणवर हवाई हल्ले करत असतानाच्या आधीच्या पाच आठवड्यांच्या तुलनेत ही संख्या २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असे गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. इस्रायलने गेल्या महिन्यात मार्च महिन्याच्या तुलनेत ३५ टक्के अधिक हल्ले केले होते. गाझामध्ये युद्ध थांबवून पुनर्रचना सुरू करण्याची योजना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली होती. पण गाझावरील इस्रायली हल्ल्यांमधील वाढ होणे हे, त्या योजनेतील प्रगती थांबल्याचे आणखी एक ठळक लक्षण आहे. गाझामधील हल्ले वाढवण्यामागील कारणांवर इस्रायली लष्कराने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, गाझामध्ये हमास आपली पकड घट्ट करत असून आपल्या सैन्याची पुनर्रचना करत आहे आणि शस्त्रे बनवत आहे. असा इशारा लष्कराने गेल्या काही आठवड्यांत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सरकारला दिला होता, अशी माहिती चार इस्रायली संरक्षण अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.