Israel- Hezbollah War: लेबनॉनमध्ये २१ दिवसांच्या युध्दबंदीचा प्रस्ताव इस्त्रायलने फेटाळला

जेरूसलेम – इस्रायलचे लेबनॉनमध्ये जोरदार हल्ले सुरू आहेत. हिजबुल्लाला चिरडण्याची एकही संधी दवडण्याची त्या देशाची आता तयारी नाही. इस्रायलने लेबनॉनमध्ये गेल्या तीन दिवसांत 2,000 हून अधिक हिजबुल्लाची ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. इस्रायल युद्धबंदीच्या मानसिकतेत नसल्यामुळे हा विनाश तूर्तास थांबणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. एका इस्रायली मंत्र्याने लेबनॉनमधील युद्धविरामाच्या शक्यतेला नकार दिला आहे आणि हिजबुल्लाला चिरडून टाकण्याचे आवाहन केले आहे.
इस्रायलचे उजव्या विचारसरणीचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी गुरुवारी लेबनॉनमध्ये 21 दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव नाकारला. त्यांनी लेबनीज सशस्त्र संघटना हिजबुल्लाला ठेचून टाकण्याचे आवाहन केले. उत्तरेतील ऑपरेशनचा एकच परिणाम असावा: हिजबुल्लाला चिरडून टाकणे आणि येथील लोकांना हानी पोहोचवण्याची त्यांची क्षमता नष्ट करणे, असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
अर्थमंत्री पुढे म्हणाले की अमेरिका आणि त्यांच्या सहयोगींनी प्रस्तावित केलेल्या युद्धविरामामुळे हिजबुल्लाला पुनर्रचना करण्यासाठी वेळ मिळेल, म्हणूनच ते युद्धविरामाच्या बाजूने नाहीत. इस्रायल लेबनॉनमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
इस्रायलचे लष्कर प्रमुख, लेफ्टनंट जनरल हरजी हालेवी यांनी बुधवारी एक निवेदन जारी केले असून ते म्हणाले की ते लेबनॉनमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली जाते आहे. सीमापार चकमकींमुळे विस्थापित झालेले उत्तरेकडील रहिवासी सुरक्षितपणे त्यांच्या घरी परत येईपर्यंत हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायलची लष्करी मोहीम थांबणार नाही, अशी शपथ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिली आहे.





