कैरो : इस्रायलने येमेनची राजधानी सनामध्ये केलेल्या हवा हल्ल्यामध्ये हौथी बंडखोरांच्या नियंत्रणात असलेल्या सरकारचा पंतप्रधान ठार झाले आहेत. इराणचे समर्थन असलेल्या हौथींकडून शनिवारी ही माहिती देण्यात आली. गुरुवारी साना येथे झालेल्या हल्ल्यात अहमद अल-राहवी आणि त्यांच्या अनेक मंत्र्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांमध्ये गटाच्या संरक्षणमंत्र्यांसह उच्च लष्करी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले, असे बंडखोरांनी एका निवेदनात म्हटले आहे. सना येथील त्याच्या अपार्टमेंटवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये अल-राहावींचा मध्ये मृत्यू झाला. राजधानी सना बाहेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॅबिनेट बैठकीत झालेल्या हल्ल्यांमध्ये हुथी संरक्षण मंत्री मोहम्मद अल-अतिफी आणि चीफ ऑफ स्टाफ मुहम्मद अब्द अल-करीम अल-घमारी यांचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज इस्रायली अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अल-घमारी यापूर्वी इस्रायली हल्ल्यात जखमी झाला होता. इस्रायल अजूनही हौथींच्या आणखी नेत्यांच्या मृत्यूची पुष्टी करता येईल का याचा आढावा घेत आहे. मात्र राहवी ठार झाल्याच्या वृत्ताला इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ आणि पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू या दोघांनी दुजोरा दिला आहे. लाल समुद्राचा किनारा आणि राजधानी सानासह देशाच्या बहुतेक वायव्य प्रदेशावर हौथी बंडखोरांचे नियंत्रण आहे. इस्रायलने गाझामधीललष्करी कारवाई सुरू केल्यापासून येमेनमधील हौथी बंडखोर इस्रायलविरोधात सक्रिय झाले होते. इस्रायल आणि इस्रायलला मदत करणाऱ्या देशांवर तसेच लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना हौथींकडून सातत्याने लक्ष्य केले जात होते. या हल्ल्यांमुळे व्यापारी सागरी वाहतूक विस्कळीत झाली होती. हौथींच्या कारवायांना इस्रायलने प्रत्युत्तराचा इशारा दिला होता. इस्रायल आणि अमेरिकेने यापुर्वी हौथींच्या नियंत्रणात असलेल्या ठिकाणांवर आणि होदेल्दो बंदरावरही हवाई हल्ले केले होते.