Iran-Israel war : इस्रायल-इराण संघर्ष तिसऱ्या दिवशीही चिघळलेला असताना इस्रायली सैन्याने इराणच्या गुप्तचर मंत्रालयावर एअर स्ट्राइक केल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या डिफेन्स माहितीनुसार, ‘ऑपरेशन रोरिंग लायन’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. IDFच्या निवेदनानुसार, या हल्ल्यात इराणच्या गुप्तचर विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित काही अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये गुप्तचर मंत्रालयाचे उपमंत्री सैयद यह्या हमिदी यांचा समावेश असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. इस्रायली बाजूने सांगितले की, ही कारवाई गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आली असून तेहरानस्थित गुप्तचर मंत्रालयाच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले. देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे IDFने स्पष्ट केले. दरम्यान, तेहरान येथे झालेल्या या कथित हल्ल्याबाबत इराणकडून तत्काळ अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. इस्रायलच्या दाव्यांना स्वतंत्रपणे दुजोरा मिळालेला नसून परिस्थितीबाबत संभ्रम कायम आहे. अलीकडील तणावानंतर दोन्ही देशांकडून क्षेपणास्त्र, रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघर्षाकडे लक्ष लागले असून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.