चाफळ शाळेकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष; पटांगणावरील बांधकाम साहित्याचा मुलांना धोका चाफळ – चाफळ, ता. पाटण येथील आयएसओ मानांकन प्राप्त शाळेला अवकळा आली असून शाळेच्या पटांगणात अस्ताव्यस्तपणे पडलेले लोखंडी साहित्य यामुळे शालेय विद्यार्थ्यांना याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून याकडे वरिष्ठ तरी लक्ष देणार का? असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे. चाफळ जिल्हा परिषद शाळेला सन 2015-16 ला आयएसओ नामांकन प्राप्त झाले. ते 2018 पर्यंत टिकले. याकाळात या शाळेचे रुपडेच पालटले. विविध उपक्रमांमुळे पालक आवर्जुन या शाळेत येवू लागले. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारु शकत नाही. मात्र मानांकनाच्या प्रमाणपत्राची तीन वर्षाची मुदत संपल्यानंतर मात्र त्याकडे शाळेच्या मुख्याध्यापकांनी लक्ष न दिल्याने या शाळेचे रुपडे आज ओंघळणाने दिसू लागले आहे. शाळेच्या आवारात सध्या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरु आहे. बांधकाम साहित्य पटांगणातच अस्ताव्यस्त टाकल्याने मुलांना खेळाताना गंभीर स्वरुपाच्या इजा होण्याच्या घटना घडत आहे. मध्यंतरी शाळा दुरुस्तीचे काम करताना ग्रंथालय विभाग, संगणक विभाग आज नाहीसा झाल्याचे चित्र असून याकडे शाळा व्यवस्थापन समिती अथवा केंद्रप्रमुखांचेही दुर्लक्ष झाले आहे. आयएसओ शाळेला आलेल्या या अवकळेला नेमके कोण जबाबदार? अशाही संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.